TransLiteral
अतिथी म्हणजे घरी आलेला माणूस, पांथस्थ, ज्याच्या येण्याला काळवेळ नाही असा, पाहुणा यांना अतिथी म्हणतात. यांचे आदरतिर्थ्य करण्याची प्रथा वेदकालापासून आहे. वैश्वदेवाच्या वेळी आलेला अतिथी मित्र, शत्रू, चांडाळा, मूर्ख वा पंडित असला तरी तो यजमानाला स्वर्ग मिळवून देणारा होतो. वैश्वदेवानंतर गोदोहनाइतका काल किंवा यदृच्छेने त्याहूनही अधिक काल अतिथीची मार्गप्रतीक्षा करावी. यजमानाने नेत्र, मन, गोड वाणी यांनी अतिथीचा सत्कार, त्याचे आतिथ्य करावे व स्वत: लक्ष द्यावे. यजमानाने आपल्या ऐपतीप्रमाणे भोजन, केवळ पाणी, फ़लाहार किंवा अंथरूण दिले तरी आतिथ्य होते. यजमान घरी नसल्यास त्याच्या पत्नीने अतिथिसत्कार करावा. भोजन देण्याची ऐपत नसल्यास बसण्यास आसन, तेही नसल्यास भूमीवर बसण्यास विनंती करावी. तेही अशक्य असल्यास निदान कुशल विचारावे.
योगी आणि सिद्ध पुरुष ब्राह्मणरूपाने पृथ्वीवर फ़िरत असतात. ब्रह्मचारी व यती यांना भोजन घातल्याशिवाय यजमानाने भोजन केल्यास त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागते. वृद्ध, हारित सांगतो, ‘ ज्याच्या घरी यती भोजन करतो, त्याच्या घरी साक्षात श्रीहरी भोजन करतो. यती गृहस्थाच्या घरी एक रात्र राहिला तर यजमानाचे सर्व पाप धुऊन जाते. ’ अतिथीआधी जो यजमान भोजन करतो, तो आपले धनवैभव व पुण्य घालवतो.
अतिथीधर्म हा गृहस्थाश्रमाचा धर्म मानला आहे. ती जबाबदारी धर्मशास्त्राने गृहस्थाश्रमावर टाकलेली आहे. अतिथीधर्माचा पुराणात अत्यंत गौरव केलेला आहे. अतिथी कोणत्याही जातीचा, धर्माचा असो, त्याला विष्णूप्रमाणे पूज्य समजून गृहस्थाश्रमाने कुशलप्रश्नपूर्वक त्याचे आतिथ्य करावे. अतिथी निघाला असता त्याला थोडे पोचवायला जावे. मनुष्ययज्ञाची ही पंचविध दक्षिना होय. अतिथी विन्मुख गेला असता यजमानाला अतिथीचे पाप मिळते व यजमानाचे पुण्य अतिथीला मिळते.
कथा :
पुराणांतरी गाजलेले अतिथी. पांडव वनवासात असताना रात्री त्यांच्या आश्रमात शिष्यांसह जाऊन जेवण मागणे; अंबरीषाची साधनद्वादशी मोडण्याची वेळ आणणे या गोष्टी दुर्वासऋषींनी केल्या. विष्णूने अतिथी म्हणून वामनरूप घेऊन बळीकडे त्रिपाद भूमी मागितली. शंकरांनी अतिथी म्हणून श्रियाळराजाकडे जाऊन त्याचा पुत्र चिलया याचे मांस भोजनास मागितले. अतिथि वेषाने ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी सती अनसूयेला विवस्त्र होऊन भोजन वाढण्यास सांगितले. या सर्व प्रकारांतून अतिथिमार्गाचाच गौरव झालेला आहे. म्हणून अतिथिधर्म श्रेष्ठ आहे.
फ़्रल - पापनाश व स्वर्गप्राप्ती.