TransLiteral
दोन्ही हात छातीजवळ जोडून व नतमस्तक होऊन समोरच्या व्यक्तिकडे मनातील भाव प्रकट करणे म्हणजेच ` नमस्कार' आणि कोणाला करतात - देवांना, गुरूजनांना, मोठ्या वडिलधारी माणसांना, शुभ कार्यात, दोन व्यक्ति एकमेकांना भेटल्यावर. देवपूजा करतांना नमस्कार हा एक उपचार असतो. तेथे साष्टांग नमस्कार आणि हात जोडून नमस्कार करतात. साष्टांग नमस्कार म्हणजे आठ अंग जमिनीला टेकवून केलेला नमस्कार. साष्टांग नमस्कार म्हणजे देवापुढे पूर्ण शरणागती. साष्टांग नमस्कार देवळात, संन्यासांसमोर, मठ पीठाधीशांसमोर, वंदनीय सत्पुरूषांसमोर करतात. याठिकाणी कांही कारणास्तव साष्टांग नमस्कार न जमल्यास गुडघ्यावर उभे राहून आणि मस्तक जमिनीला टेकवून नमस्कार करावा.
शिष्टाचार म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. कोणी स्त्री समोर आली असता हात जोडून नमस्कार करावा. याला अभिवादन सुद्धां म्हणतात. हिंदू धर्मांत आलिंगन अथवा हस्तांदोलन पद्धत मान्य नाही. गुरूजनांस अथवा मोठ्या माणसांना नमस्कार करतांना पायाला हात लावून नमस्कार करावा, इथे दोन्ही हात दोन्ही पायाला लावावेत. याला चरणस्पर्श म्हणतात. वारकरी संप्रदायात पायाला हात लावून नमस्कार करतात त्याच वेळेस विलंब न लावता वयाचा विचार न करता प्रतिनमस्कार करतात, कारण या संप्रदायात सर्व मानवात पांडुरंग वास करतो अशी भावना आहे.
फार महत्वाचे म्हणजे एकाद्याने नमस्कार केल्यास त्याला प्रतिनमस्कार करावाच. नमस्काराचे प्रकार तीन कायिक, वाचिक आणि मानसिक. खाली वाकून दंडवत घालून नमस्कार करतात तो कायिक म्हणजे शरीराने केलेला नमस्कार, वाचिक म्हणजे शब्द उचारून केलेला नमस्कार आणि मानसिक म्हणजे मनोमन भावपूर्वक केलेला नमस्कार. सर्व नमस्कारात श्रेष्ठ नमस्कार म्हणजे साष्टांग नमस्कार.
रोज देवाला नमस्कार करतात, मुले रोज आईवडिलांना नमस्कार करतात, नोकरीच्या ठिकाणी रोज भेटतात त्यांना केलेला नमस्कार हा नित्य नमस्कार. प्रसंगानुरूप नमस्कार म्हणजे समारंभात किंवा आरती, पूजेच्यावेळी केलेला नमस्कार. कांहीजन फक्त काम काढण्याच्या हेतूने, अथवा मनात कांही हेतू बाळगून नमस्कार करतात, तो खोटा नमस्कार, तोंडदेखला नमस्कार.