श्राद्धाचें प्रयोजन :-
मृत मनुष्याचे आत्म्यास सुख व्हावे म्हणून श्रद्धेने अर्थात् भक्तिभावानें जें दान देतात अगर जीं इतर कृत्यें करितात, त्यास श्राद्ध म्हणतात. होम ( अग्नौकरण ), ब्राह्मण - भोजन व पिण्डदान, ही तीन कृत्यें श्राद्धांत मुख्य होत. धर्मसिंधूंत म्हटले आहे कीं, जो श्रद्धा न ठेवितां, पितर नाहींत असें मानून श्राद्ध करीत नाही, त्याचें रक्त पितर पितात !
श्राद्धाचे चार भेद आहेत.
एकोद्दिष्टश्राद्ध - एकाला म्हणजे मृताला उद्देशून एक पिंडानें जें श्राद्ध करावयाचें तें एकोद्दिष्टश्राद्ध
सपिंडीश्राद्ध, - वर्षांती किंवा बारावे दिवशीं अर्घ्य व पिंड यांचे संयोजन करून जें श्राद्ध करावयाचें ते सपिंडीकरणश्राद्ध
पार्वणश्राद्ध - बाप, आजा व पणजा या तिघांस उद्देशून तीन पिंडांनी युक्त असें जें श्राद्ध करावयाचें तें पार्वनश्राद्ध ( प्रतिसांवत्सारिक वगैरे ).
नांदीश्राध - चौल, पुत्रजन्म, विवाह इत्यादि प्रसंगीं जें वृद्धिश्राद्ध करावयाचें तें नांदीश्राद्ध होय.
अंत्येष्टिप्रकरणांत पहिल्या दोन प्रकारच्या श्राद्धांचा समावेश होतो.